तो…

आज तो मला खूप दिवसांनी भेटला. फार आतुर होऊन नव्हते वाट बघत मी त्याची पण त्याच्या येण्याची जाणीव झाल्यावर असं वाटायला लागलं की हो मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी का होईना मी त्याची वाट बघत होते.
कामाच्या व्यापात गुंतलेल्या मला जरा उशिराच झाली त्याची चाहूल. खरं काय ते बघण्यासाठी म्हणून खिडकी जवळ गेले आणि बदललेलं वातावरण क्षणात मला जाणवलं. हवेत मंद गारवा पसरला होता. आकाशात ढगांची दाटी झाली होती. दुपार असून पण संध्याकाळचा भास होत होता. जगाचं नेहमीचं रहाटगाडगं तसंच चालू होतं पण काहीतरी बदललेलं होतं.
तो येईल म्हणून बराच वेळ मी खिडकीत होते पण खूप वेळ झाला तरी तो येईना. ‘भासच तो’ समजूत घालून मी कामाला सुरुवात केली.पूर्ण लक्ष केंद्रित करून काम चालू होतं. आणि अचानक लक्ष विचलित झालं… त्याच्या आगमनाच्या वार्ता देणाऱ्या टपटप ह्या आवाजानी…
त्याच्या भेटीसाठी आतुर झालेलं माझं मन त्याच्या चिंब मिठीत कधीच विसावलं होतं. नजरेसमोर तो दिसताच ते अजून वेडावून गेलं. आजूबाजूचं सगळं विसरून आमच्या गप्पा चालू झाल्या. बोलत तो होता आणि मी तो आवाज मनात साठवत फक्तं ऐकत होते.
त्याच्या येण्यानी खरंच काहीतरी जादू होते.त्याच्या खूप दिवसांच्या विरहानंतर त्याचं ते अचानक येणं काही क्षणांपुरतं का होईना पण सुखावून जातं. एक नवीन संजीवनी देऊन जातं.
तो गेला… जसा आला होता तसा गेला… आजूबाजूचं वातावरण अजूनही त्याची माझी झालेली भेट ताजी ठेवत आहेत. त्याच्या मिठीतलं माझं मन अजूनपण तिकडेच आहे कदाचित…
तू लवकर ये, तुझी आठवण येते खूप, तुझी गरज आहे असं त्याला ओरडून सांगावसं वाटलं पण नंतर विचार आला तू वेळेच्या आधी नको येऊ पण वेळेत ये. कारण तेव्हा तुझी गरज बाकीच्यांना जास्तं असते. मला तर फक्तं गप्पाच मारायच्या असतात तुझ्याशी पण काही लोकांची खूप महत्त्वाची कामं फक्तं आणि फक्तं तुझ्यावरून अवलंबून असतात…
त्यांचा विचार करून, मनावर दगड ठेऊन एवढंच सांगेन की मला खूप आठवण येते तुझी पण असा वेळीअवेळी नको येऊस. ठरलेल्या वेळी ये आणि भरपूर दिवसांसाठी ये आणि माझ्यासोबत सगळ्यांनाच तुझ्या स्पर्शानी चिंब करून जा…

तुझी चातकासारखी वाट बघणारी,
अनन्या

terranea-life-rain-room-lacma-1

2 thoughts on “तो…

Leave a comment