कॉफी

एकदा चहावर लिहून झाल्यावर हिच्या विषयी थोडं का होईना लिहिणं भाग आहे. कोणी सांगावं रुसून वगरे बसली तर? बाकी कोणीही रुसलेलं चालेल हिचा रुसवा परवडायचा नाही.

ही कुठून आली? कशी आली? पहिल्यांदा कधी आली? ह्या सगळ्या प्रश्नांपेक्षा ती कुठून का होईना तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात आली हे जास्तं महत्त्वाचं आहे.

चहा म्हणजे रोजचा दिवस चालू करणारं एक इंधन, सकाळच्या घाईच्या वेळेला १५ मिनिटांमध्ये तो कप रिकामा होऊन जातो. कॉफी चहासारखी नाही. हिच्या सोबतीत वेळ घालवायचा म्हणजे निवांतपणा पाहिजे. उगाच प्यायची म्हणून १० मिनिटात तो कप रिकामा केला; असले अत्याचार हिच्यावर करायचे नाहीत. दिवसा गप्पा मारायला हातात चहा चालतो पण रात्रीच्या निवांत क्षणी हिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग हिच्या शोधार्थ रात्री १० ला गुडूप होणाऱ्या पुण्यात १२ वाजता पण आम्ही भटकतो ‘कोणी कॉफी देतं का कॉफी’ असं मनातल्या मनात म्हणत आणि मग चांदणी चौकातल्या ccd पाशी आल्यावर जो काही आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो…
विलायती लोकांनी हिच्या खानदानाशी उगाचच ओळख करून दिली असं बऱ्याचदा वाटतं… cappuccino काय, mocha काय, latte काय किंवा espresso काय… सुरुवातीला दरवेळेस वेगवेगळं मागवून बघितलं पण मग कॉफी आली की तिच्यामागून असंख्य गप्पा येतात आणि मग त्या ओघात त्या कॉफी मधे दुध जास्तं होतं, का फेस जास्तं, की espresso जास्तं ह्या गोष्टी नगण्य ठरतात… पण एकंदरीत मला latte हा प्रकार जास्तं आवडतो…

दिवस सुरु करण्यासाठी ही नसते असं माझं मत आहे आणि ह्याला कारण म्हणजे वेळ… हिचा आस्वाद घेत बसण्यासाठी सकाळी वेळ नसतो आणि वर म्हणाल्याप्रमाणे हिच्यावर अत्याचार जमत नाहीत. असो… तर हिच्याबरोबर दिवस सुरु नाही HA0083करता आला तरी तो संपवायला हिच्यासारखा मोहक साथीदार नाही… खोलीमधला एक निवांत कोपरा, हातात एक पुस्तक, तिथे दरवळणारा तो मंद सुवास आणि त्या सुवासाला कारणीभूत असलेली भल्या मोठ्या मग मधे शांतपणे स्थिरावलेली ती… दिवस कितीही वाईट गेलेला असुदे पण तो एका घोटात सुंदर बनवण्याचं सामर्थ्य ही लीलया पेलते…
हिच्या वासात पण एक वेगळीच जादू आहे. कुठून पण आला तरी मन एकदम शांत होऊन जातं. आजूबाजूचा गोंधळ, गर्दीचा आवाज सगळं mute होऊन जातं. समोर फक्तं ती असते बाकी सगळ्याचा मग विसर पडतो…

हिचा रोज आस्वाद घेणं चांगला नसतं असं बरेच थोर लोक म्हणून गेले… पण शेवटी ते म्हणतात नं ऐकावे जनाचे करावे मनाचे आणि कॉफी च्या बाबतीत तर करावेच करावे…

मला कधीकधी असा प्रश्न पडतो की मला चहा जास्तं आवडतो का कॉफी? मग वाटलं घड्याळात किती वाजलेत ह्यावर अवलंबून असेल पण असं काही नाहीये हे मला लगेचच जाणवलं. दिवसाला ४ कप चहा आरामात रीचवणारी मी, कॉफीसाठीcb1949dfca8d610c1b84f71e5445a872 पण कधीही तयार असते. पण हो एक मात्र आहे जेवढे निराळे प्रकार मला कॉफी चे आवडतात तेवढे चहाचे नाही आवडत. आल्याचा चहा आणि ice tea ह्यातच माझ्या मर्यादा संपतात आणि कॉफी म्हणालं की मग black कॉफी पासून, कॉल्ड कॉफी पर्यन्त सगळे जिभेचे चोचले पुरवायला तयार असतात… आता वाटतंय की मला कॉफी जास्तं आवडते पण तरी दिवसाची सुरुवात कॉफी नी करायची हे मनाला तेवढं पटत नाहीये…

आता हे सगळं डोक्यात आलं तेव्हा मी कॉफी बनवत असेन किंवा पित असेन असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यात चूक काहीच नाहीये. सांगितलं नं हिच्या वासात एक जादू आहे, पहिल्या उकळीबरोबर शब्द डोक्यात यायला लागले होते…
पण हे लिहिताना मी तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाहीये… black कॉफी नी तुडुंब भरलेला तो कप मगाशीच रिकामा झाला आहे…

आत्ता डोक्यात माझ्या एकच विचार चालू आहे… मधे एकदा आईनी strawberry flavor ची उदबत्ती आणली होती, तशी तुमच्या पाहण्यात कॉफी flavor ची उदबत्ती असेल तर मला जरूर कळवा… मला स्वतःसाठी तर घ्यायचीच आहे पण यादी मधे बरीच लोकं आहेत ज्यांना मला ही भेट म्हणून द्यायची आहे…

-कॉफीमय अनन्या

5 thoughts on “कॉफी

  1. Wow Ananya!
    Kiti sundar lihites..tasa me pan coffee premi ch..pan he vachun mala asa vatatay ki maza kiva kontyahi coffee cha prem tu kiti akarshak pane tuza shabdanmadhun vyakta kelay 🙂

    Liked by 1 person

  2. Mast..
    Bare zale tu “Coffee” baddal lihiles, tila jari raag nasta ala pan mala matra nakki ala asta.
    I like coffee..

    He vachun coffee pinyachi iccha zali tayat naval kay?

    keep it up.

    Mag kadhi bhetayache coffee sathi?:)

    Liked by 1 person

Leave a comment