निरागस ती…

एकविसाव्या शतकात पदार्पण करून १५ वर्ष झाली, हे सोळावं… बरंच काही सुधारलं, बऱ्याच काही नवीन गोष्टी झाल्या, नाही असं नाही. पण काही मुलभूत गोष्टी आज पण तश्याच आहेत ज्या खूप आधीच बदलायला पाहिजे होत्या…

एका मुलीची सुरक्षितता… काही करणार आहोत आपण ह्यासाठी? का फक्तं समोर जे दिसतंय ते बघत राहायचं, दुसऱ्या दिवशी चहा चे घोट घेत ती बातमी पेपर मधे वाचायची आणि हे सगळं कधी सुधारणार नाही असं म्हणत स्वतःच्या कामाला लागायचं. हो! बरेच लोकं हेच करतात ओ. कारण ह्याचा त्यांच्या आयुष्यात काहीच परिणाम होणार नसतो. नेहमीच्या खुसखुशीत बातमी सारखी ही पण बातमीच असते त्यांच्यासाठी…
कधी विचार केलाय त्या मुलीला काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल? आणि तुम्ही विश्वास ठेवा नाहीतर नका ठेऊ पण ती कुठून आली, कशी राहते आणि तिच्या बाबतीत घडणाऱ्या प्रसंगांचा काडीमात्र संबंध नसतो. ती कशीही असुदे, दुर्दैवानी तिला एकदा तरी ह्या सगळ्याला सामोरं जावं लागतं.

तिच्या संरक्षणासाठी apps आले, संघटना तयार झाल्या पण काही बदल झाला? मुळात तिला app वापरायची गरज का पडावी? १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या स्वतंत्र देशात तिच्या सुरक्षेसाठी कोणीच नसावं? ह्याहून दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते? ह्यात चूक कोणाची हे पण नाही ठरवता येत, खूप विश्वास असलेल्या नातेवाईकांकडून पण जर तिला असे काही अनुभव येत असतील तर तिनी विश्वास तरी कोणावर ठेवावा? तुम्ही म्हणाल तिनी आवाज उठवला पाहिजे पण तुम्हाला असं वाटतं नातेवाईकांकडून आलेला अनुभव तिनी सांगितला तर तिच्या घरचे सहजासहजी विश्वास ठेवतात? इथे पण कधीतरी तिलाच दोषी ठरवलं जातं, “तू काहीतरी वेड्यासारखा विचार नको करू. तुला ते त्यांच्या मुलीसारखी मानतात”. तिला काय वाटत असेल हे ऐकून? अशा बाबतीत कोणी खोटं नाही बोलत आणि बोलू पण नाही शकणार.
घरी वर्षानुवर्ष काम करणारा गडी एक दिवस अचानक वाईट नजरेनी तिच्याकडे बघायला लागतो, काय सांगणार ती आणि कोणाला? एवढी वर्ष घरी काम करतो, त्याच्या संपूर्ण परिवाराला आपण ओळखतो त्याच्यावर असा आरोप करणं तिच्या घरच्यांना नाही पटत कधीकधी. करते ती सहन निमुटपणे. कारण ती काही बोलायला जरी गेली नं तरी अशा गोष्टी तिच्यावर उलटायचं प्रमाण जास्तं असतं.

रस्त्यावर शांतपणे गाडी चालवताना ८ लोकांचं टोळकं येऊन तिला घेरतात. त्यांच्या मधे ती पुरेपूर अडकली जाते. कोणी येतं काही करायला? जाहिरातींमध्ये खूप काही दाखवतात की एका बाजूनी हिंदू येतो, एकीकडून मुसलमान, पारसी, ख्रिश्चन, सीख सगळे येतात आणि तिच्या भोवती कडी करून उभे राहतात. असं खरंच होतं कधी? प्रत्येकजण स्वतःच्या तंद्रीत एवढा गुंतलेला असतो की बऱ्याचदा ह्या गोष्टी त्याला दिसत नाहीत आणि दिसल्या तरी “उगाच कशाला अडकायचं” हा विचार करून तिथे दुर्लक्ष केलं जातं. त्या मुलीनी काय करावं? गाडीवरून वाट दिसेल तिकडे पळत सुटायचं? अशावेळी घरी येणं पण धोकादायक असतं कारण मग घर माहित होण्याची भीती असते. तिची काहीही चूक नसताना तिनी का घाबरावं? एक मुलगी आहे म्हणून?
घरच्या रस्त्यावर दारू पिऊन, गलिच्छ गाण्यांवर नाचत मिरवणूक निघालेली असते. घरी पोहोचायचं तर तिला ह्या सगळ्या दिव्याला सामोरं जावं लागणार असतं. हिंमत बांधून त्यातून वाट काढत ती निघते आणि गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी येऊन तिला चिकटतं. काय करावं काय तिनी? ओरडली तर त्या गर्दीत गाण्यांच्या आवाजापुढे काहीही ऐकू येत नसतं. त्याला बाजूला ढकललं आणि तो पडला तर सगळी गर्दी हिच्यावर धावणार असते त्याला धक्का दिला म्हणून. काय करायचं तिनी? सहन करायचं? शांत उभं राहायचं सगळं बघत ?

९ वाजले आणि ती घरी नसेल आली तर तिच्या आईबाबांचा जीव टांगणीला लागतो. तिला उशीर होणार असेल तर ती घरी येईपर्यंत त्यांना झोप नाही लागत. कुठच्या नवीन परिसरात कामासाठी गेली की तिला १७६० फोन येतात, ‘नीट आहेस नं?’, ‘पोचलीस नं?’, ‘निघताना फोन कर.’, ‘लवकर ये’ आणि बरंच काही. कधीतरी असं होईल का की तिचे आईबाबा तिच्या बाबतीत निश्चिंत होतील. कधीतरी ते विश्वास ठेऊ शकतील समाजावर?
तिनी आवाज उठवला, तिचं नाव येतं सगळीकडे. अपराध्याला योग्य ती शिक्षा मिळण्यापेक्षा तिच्या बदनामीची टक्केवारी जास्तं असते. जगभरात असंख्य cases अशा आहेत की ज्या नोंदवल्या जात नाहीत. अपराधी पकडला गेला तरी त्याला पाहिजे ती शिक्षा मिळते? त्या मुलीचं संपूर्ण आयुष्य संपतं आणि अपराध्याला तो लहान आहे म्हणून समज देऊन सोडून देण्यात येतं? तो लहान आहे तर ही अक्कल कुठून आली त्याला? आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं? ती कमी कपडे घालते म्हणून अशा प्रसंगांना तिला सामोरी जावं लागतं असं कोणी म्हणूच कसं शकतं? आणि असं म्हणून पण ज्या अंगभर कपडे घालतात त्यांना काही होणार नाही ह्याची शाश्वती कोणी नाही देणार.

कधीतरी तिच्या घरचे तिची काळजी नं करता शांतपणे झोपतील? रात्रीच्यावेळी रस्त्यावरून ती निश्चिंत मानाने जाऊ शकेल? एका दिवसासाठी का होईना तिला मोकळा श्वास घेता येईल?
खरंच कधी बदलणार हे सगळं? मग कधीतरी वाटतं, तिला जगात येऊन जर हेच बघायचं असेल तर जे गर्भपात करून घेतात त्यांची काय चुकी असते? तिच्यावर होणारे अत्याचार इतके वाढलेत का की तिला जन्माला घालायची पण भिती वाटावी?
आहे उत्तर?

– त्यांच्यामधलीच एक, अनन्या

Advertisements

One thought on “निरागस ती…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s