पुणेरी वाहतूक

सध्याच्या ह्या भर पावसाळी(!) दिवसात साधारण ५ किलोमीटर चा रस्ता कापायला कमीत कमी २५ मिनिटं लागतात(तरी बर आहे मी पुण्यात राहते… मुंबई मधे असते तर विचारायलाच नको!). तर ह्या २५ मिनिटांत करायचं काय? एक दिवस प्रश्न पडला. फोन मधली तीच तीच गाणी ऐकून मला कंटाळा आलेला आणि त्या वैताग आणणाऱ्या ट्राफिक मधे मला radio वरच्या जाहिराती, RJची बडबड आणि चुकून लागणारं एखादं गाणं हे ऐकण्यात पण अजिबात रस नव्हता. मग काय मी एक प्रयोग चालू केला, प्रयोग पेक्षा नं निरीक्षण चालू केलं. ट्राफिक, सिग्नल आणि रस्त्यावर दिसणाऱ्या असंख्य असामी आणि त्यांची वैशिष्ट्ये. बघूया कितपत जमलंय…

१. ओबामा, मोदी, इंग्लंड ची राणी ह्यांचे खासगी सल्लागार
इतके वर्ष अदृष्य असणारी ही जमात सध्या असंख्य प्रमाणात तुमच्या आमच्या बाजूला फिरत असते. आणि त्यांच्या संख्येत रोज हजारोंची भर पडत आहे.
ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोन कधी हातातून सोडत नाहीत. एकीकडे गाडी सांभाळताना हे सफाईदार पणे दुसऱ्या हाताने फोन वापरायचा प्रयत्न करत असतात. मग तो फोन कधी कानाला लावलेला असतो किंवा त्यावर दुरवाहक संदेश(message) लिहित असतात. फोन वर बोलणं एकवेळ माफ पण लिखाण पण तिकडेच? ह्यांना मोदी विचारात असतात का की “मी आता कुठचा दौरा करू ते सांग आणि call नको करून message टाक”.
बाकी कोणाचाही केला जात नसेल एवढा उद्धार ह्यांचा व ह्यांच्या जवळच्या नातलगांचा केला जातो.

ह्यांचे दुसरे जातवाले, ते जरा समजूतदार असतात. त्यामुळे गाडीवर फोन वापरणं ते टाळतात. पण गाडी signal ला थांबली रे थांबली की लगेच फोन बाहेर. मग एकदा whatsapp check कर एकदा facebook बघ असे ह्यांचे उद्योग चालू असतात. ठीक आहे तुम्ही socially रहा active पण सिग्नलला? green signal ला ५ सेकंद असताना फोन lock होऊन खिशात जातो आणि हे ट्राफिक चे नियम पाळायला मोकळे होतात.

२. कर्वे, fergusson, गांधी, बाजीराव इत्यादींचे वंशज
वरील आणि अशी अजून बरीच पुण्यातल्या काही रस्त्यांची नावं आहेत. थोर मंडळींची आठवण म्हणून त्या रस्त्यांना ही नावं दिली गेली, काहीकाही त्या रस्त्यावरच्या वास्तू मुळे गाजली. तर… ह्या जमाती मधली लोकं आपण गाडी चालवत असलेला रस्ता आपल्या परमपुज्यांच्या मालकीचा आहे आणि तो आपल्यासाठीच बांधला गेला आहे अशा अविर्भावात गाडी पळवत असतात. स्वतःची चूक असताना पण समोरच्याला कसं ऐकवायचं हे ह्या लोकांकडून शिकायचं. हे महाराज/महाराणी येणार wrong side नी आणि सरळ मार्गी चालणारा जर ह्यांच्या समोर आला तर हे उलट त्यालाच ऐकवणार.(ह्यांच्या नादी नं लागलेलंच चांगलं असतं)

३. ये कहा आ गये हम
ह्या वर्गातली लोकं वर्षानुवर्ष पुण्याच्या त्याच रस्त्यावरून गाडी चालवत असतात पण तरी ह्यांना आजू बाजूला काय आहे ते बघायचं असतं आणि मग अशावेळी चेहऱ्यावर एकदम रस्ता चुकल्यासारखे भाव असतात. मला वाटायचं आजूबाजूची हिरवळ बघत असतील पण नाही, ह्याचं लक्ष रस्त्यावरच्या दुकानातल्या showcase वर असतं किंवा आकाशात उडणारा एखादा पक्षी(मग तो कावळा, वटवाघूळ, घार कोणताही असुदे)… असं काहीतरी बघायला काही प्रोब्लेम नाहीये कोणाचाच. मुळात मनुष्य हा सौदर्याचा निस्सीम चाहता आहे. जिथे सौंदर्य तिथे ह्याची मान वळणार पण मी काय म्हणते, हा सगळा मनोरम्य आस्वाद घेताना तुम्ही गाडी चालवणार २०-३० च्या speed नी. मग उजव्या बाजूच्या लेन(पुण्यात काही लोकं आहेत जी लेन पाळतात!) मधे काय ठेवलं असतं तुमच्यासाठी? जा डाव्या बाजूला आणि बघा काय बघायचंय ते…

४. भूगोलात गोल
काही काही लोकांच्या नं basic मधेच प्रोब्लेम असतो. देव अक्कल जेव्हा वाटत होता तेव्हा ही लोकं आपण बुंदी पडतो ती चाळण घेऊन बसलेली असणार, पूर्ण खात्री आहे माझी.
पूर्ण रस्ता ही लोकं उजव्या बाजूनी गाडी चालवतात आणि अचानक त्यांना साक्षात्कार होतो की आपल्याला तर डावीकडे वळायचं होतं. मग आपण कुठे आहोत, आपल्या गाडीचा आकार किती, मागे किती लोकं आहेत हा कसला ही विचार नं करता गाडी बिनधास्त डावीकडे घुसवली जाते. ह्यांना दिशाच कळत नसतात.
अर्धा किलोमीटर आधीपासून गाडीचा डावा indicator चालू असतो. आपल्याला वाटतं आता वळतील मग वळतील पण इतक्यात काही वळत नाही. पुढे एक चौक दिसतो, आपल्याला वाटतं आता गाडी नक्की डावीकडे वळणार म्हणून आपण speed वाढवून त्यांना उजव्या बाजूने overtake करायला जातो तर हे महाभाग अचानक गाडी उजवीकडे वळवतात आणि वर रागानी बघत राहतात… ह्यांना विचारलं “indicator नाही का देता येत” तर उत्तर ready असतं, “दिला आहे नं, दिसत नाही का?”. आता ह्यांना कुठल्या भाषेत सांगायचं?

५. आठव्या महिन्यातच बाहेर
ह्या लोकांना काय घाई असते एवढी कळत नाही. ६० सेकंद signal ला थांबायला पण त्यांना जड जातं. ९ महिने पण पूर्ण केले नसतील ह्यांनी. तेव्हापासूनच घाई घाई…
समोर रेड signal दिसत आहे, तुमच्या पुढे गाड्यांच्या ५ आडव्या रांगा आहेत, त्या निघाल्याशिवाय तुम्हाला नाही निघता येणारे तर मग तुम्ही तो कर्णकर्कश्य आवाजात horn का वाजवत बसता? करा जरा गाडी बंद, वाट बघा, तो रेड signal कायमचा नसतो.
ह्यांचे काही भाऊबंधू असतात, green signal लागला रे लागला की ह्यांना असं वाटत असतं आपली गाडी लगेच इथून बाहेर पडावी. जो पर्यंत समोरची गाडी हलत नाही तोपर्यंत हे लोकं horn वाजवत बसतात. ह्यांच्या horn नी पुढची गाडी नाही पुढे जाणारे पटकन, तिला जेव्हा जायला मिळेल तेव्हाच ती जाणार असते. पण patience नाही अजिबात.
ह्यांचे अजून काही भाऊबंधू असतात, ते चुकून सुद्धा signal ला थांबत नाहीत. जणू लाल आणि हिरव्या मधला फरकच कळत नाही. स्वतः signal तोडायचा आणि मधे एखादी गाडी आली की चालकाकडे रागाने भागायचं एवढंच येतं ह्यांना.

६. सर्कशीतले निवृत्त झालेले “motorcycle cage” चालक
सगळ्या जमातीमधली ही माझी सगळ्यात जास्तं आवडती जमात आहे. थोड्याफार प्रमाणात मी स्वतः ह्या वर्गात मोडते.
ह्यांना कोणाची भीतीच वाटत नाही. जिथे जागा दिसेल तिथे हे गाडी घालतात आणि पटापट सगळ्यांना मागे टाकत पुढे जातात. DSK शून्यातून विश्व निर्माण करतात, ही लोकं शून्यातून रस्ता निर्माण करतात. ही कला सगळ्यांना अवगत नसते, ती मिळवण्यासाठी पुण्यात वर्षानुवर्ष गाडी चालवायची तपस्या करावी लागते आणि आपण पुढे जाताना कानावर पडणारे शीघ्र स्वरातले शब्द टाळावे लागतात. ‘येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळाचे काम नव्हे’, ही म्हण इथे अगदी छान बसते.
पुण्यातील दुचाकी चालवणारी जास्तीत जास्तं जनता ह्या वर्गात मोडते. पण खरंच सांगते दुसऱ्याला अजिबात त्रास नं देता अशी गाडी चालवली ना की एक वेगळंच समाधान मिळतं(निदान मला तरी. तुमचं मला माहित नाही)

७. नाकापेक्षा मोती जड
बाकीच्या जनतेपेक्षा ही जनता जरा विरळ असते. आवड म्हणून मोठ्या गाड्या घेतात आणि मग पाय पोहोचत नाही खाली सिग्नल ला उभं राहिल्यावर. मग काय, जनाची नाही आणि मनाची पण पर्वा नं करता गाडी सरळ side stand ला लावली जाते आणि चालक त्यावर आरामात उभे राहतात. हे झालं दुचाकी स्वारांचं. चारचाकी वाले ह्यांच्याहून वरचे असतात, सीट वर बसल्यावर break, clutch, accelerator ह्यावर नीट पाय पोचत नाही आणि समोरच्या खिडकीतून पुढचं पण स्पष्ट दिसत नाही. एक उशी खाली आणि एक उशी मागे अशी तयारी करून हे बिलंदर अतिशय सफाईदारपणे गाडी चालवत असतात. ह्यांच्या शेजारी जाऊन उभं राहिल्याशिवाय ह्यांनी केलेलं जुगाड लक्षात येत नाही.

एवढी सगळी आणि अजून पण बरीच वर्गवारी असून पणmain_1000 मला माझ्या पुण्याच्या ट्राफिक चा अभिमान आहे आणि असा तसा नाही तर जाज्वल्य अभिमान. कारण मधील काळात झालेल्या सर्वेक्षणानुसार पुणे हे भारतातील सगळ्यात जास्तं दुचाकी असणारं शहर म्हणून नोंदलं गेलेलं आणि हे असून पण फार कमी वेळा आम्ही ट्राफिक च्या संकटात अडकलो जातो…

तळटीप – १. ह्यातली निरीक्षणासाठी वापरण्यात आलेली पात्र खूप निरनिराळी आहे, तुम्ही जर कुठल्या वर्गात मोडले जात असाल तर तो तुमचा प्रश्न आहे.

२. ह्यात एक महत्वाची वर्गवारी राहिली आहे आणि ती म्हणजे पुण्याबाहेरून आलेली, बाराची आणि चौदाची नसलेली आणि स्वतः एक पण नियम नं पाळता पुण्याच्या ट्राफिक चा उद्धार करणारी जनता. ह्यांच्याविषयी लिहिणं आत्ता तरी टाळते मी, नंतर कधी जमलं तर बघू…

-एक पक्की पुणेरी, अनन्या

Advertisements

One thought on “पुणेरी वाहतूक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s