आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठे तरीही नाही म्हणवत नाही…

फ. मु. शिंदे ह्यांची गाजलेली कविता. मनाला खोलवर स्पर्श करून जाणारी. अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी आईचं वर्णन केलं, पण खरंच आई कळाली आहे कोणाला? आयुष्यातली अनेक कोडी योग्य वेळी सुटत जातात पण आई हे कोडं कधीच नं सुटणारं आहे.

आई… तसं म्हणायला गेलं तर मराठी मुळाक्षरात सलग येणारी दोन अक्षरं पण त्याचा अर्थ खूप गहिरा…
आई… हे रसायन नक्की काय आहे? कळालं आहे कधी?
कधी ती दुधावरच्या सायीसारखी मऊ वाटते तर कधी आगीसारखी ज्वलंत…
कधी ती पाण्यासारखी वाटते, सगळ्यात मिसळणारी…
तर कधी विद्युल्लतेसारखी, तेजस्वीपणे कडाडणारी…
आई म्हणजे वात्सल्यानी भरलेलं पोतं,
आई म्हणजे शंभर नंबरी सोनं…

स्वतःच्या पिल्लाच्या सुखाशिवाय तिला दुसरं काहीही नको असतं. संपूर्ण घरासाठी ती आयुष्यभर झगडते पण बोलत एका शब्दानी पण नाही. घरातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक सवयी, आवडीनिवडी तिला माहित असतात, त्यात बऱ्याचदा ती स्वतःच्या आवडी पण विसरून जाते. दिवस रात्र ती पिलासाठी उबदार निवारा बनवत असते अगदी स्वतःचं अस्तित्व विसरून…
पिल्लू कसं पण असलं तरी त्याचं मनभरून कौतुक करणारी ती आईच असते,
आणि पिल्लाचं यश बघून हळूच आनंदाश्रू पुसणारी ती आईच असते…
चूक झाल्यावर रागावणारी, फटके मारणारी आईच असते,
आणि तिच्यावर चिडून पिलू नं जेवता झोपलं तर उपाशी राहणारी पण आईच असते…

जिजामाता बनून ती शिवाजी घडवते तर कधी पिलाला घेऊन लढायला जाणारी झाशीची राणी बनते. कधी झोपल्यावर हळूच येऊन अंगावर पांघरूण घालणारी वात्सल्यमुर्ती बनते तर कधी मन मोकळं होऊ देणारी एक मैत्रीण… खरंच नानाविधं रूपं तिची, कितीही केली तरी कमी पडेल अशी महती तिची…

घरातल्या प्रत्येकासाठी जगताना ती स्वतःचं जगणं विसरून जाते पण त्याची तक्रार कधीच नाही करत. डब्बा करायला सकाळी लवकर उठते, पिल्लू आलं नाही म्हणून रात्र जागून घालवते आणि दुसऱ्यादिवशी परत त्याच हसऱ्या चेहऱ्यानी परत उभी रहाते. तब्येत बरी नसताना पण सगळ्यांच्या आवडी ती सांभाळते आणि कधी स्वतःला आवडणारा घास पिल्लासाठी बाजूला ती काढून ठेवते. पिल्लाला काही झाल्यावर, त्याच्या काळजीनी टचकन डोळ्यांत पाणी आणणारी ती, स्वतःचं दुःख कधीच बाहेर येऊ देत नाही. सतत ती कणखर राहते, नं स्वतः खचते नं घरच्यांना खचू देते. स्वतःला पूर्ण करता नं आलेलं प्रत्येक स्वप्न ती तिच्या पिल्लात बघते. ती कमी पडली पण तिचं पिल्लू कमी पडता कामा नये ही एकंच जिद्द ती कायम ठेवते. बाकी कोणाला असो वा नसो ती स्वतः आपल्या पिल्लावर कायम विश्वास ठेवते, गरज पडल्यास सगळ्यांच्या विरोधात जाऊन आपल्या पिल्लाला पाठींबा देते, त्याचं यश बघून हात दुखेपर्यंत टाळ्या वाजवते… ती तिच्या पिल्लासोबत कायम असते…
खरंच किती निस्वार्थी जग असतं आईचं, तिच्या घराभोवती गुरफटलेलं. मग ती कायम घरी असणारी आई असुदे किंवा उंच आकाशात उडणारी घार… तिचं चित्त हे कायम तिच्या पिल्लांपाशीच असतं.

नक्की कशी असते आई? काय जादू असते तिच्या स्पर्शात? नं aai1बोलता आपल्या मनातलं सगळं कसं कळतं तिला? तिच्या मांडीत डोकं ठेवल्यावर सगळी संकट सोपी कशी वाटायला लागतात? तिनी डोक्यावरून फिरवलेला हात सगळी दुःख कसा घेऊन जातो? घरात आल्यावर ती दिसली नाही की मन सैरभैर का होतं? ती नसली घरात की ते घर का नाही वाटत? तिच्या एका हास्यासाठी मन संपूर्ण जगाशी लढायला कसं तयार होतं? का ती सोबत असली की मन आगीतून पण चालतं? का तिच्या दुराव्याच्या विचारानी मन पुरतं शहारतं?

फ. मु. शिंदे पुढे म्हणतात,
आई असतो एक धागा,
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा…
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान,
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान…

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही आणि उरतही नाही…

– माझ्या आईची चिऊ

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s